चंद्रपूर - जातीमध्ये होणाऱ्या लग्न समारंभात न जाणे या क्षुल्लक कारणामुळे चक्क जातीतून कुटुंबालाच बहिष्कृत केल्याने त्या परिवाराची कुणी मदत केली नाही, इतकेच नव्हे तर बहिष्कृत कुटुंबातील कर्त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यावर त्याचा पार्थिवाला खांदा द्यायला कुणी आला नाही त्यामुळे मुलींनीच वडिलांच्या पार्थिवाला खांदा देत अंत्यसंस्कार केले.
जात पंचायतीच्या तुघलकी फर्मानामुळे अनेकांनी निषेध केला.
गोंधळी समाजाचे प्रकाश ओगले यांचा विवाह 1986 ला झाला होता, विवाहांनातर सर्व सुरळीत सुरू होते मात्र आर्थिक स्थिती खराब असल्याने समाजातील कार्यक्रमात त्यांनी हजेरी लावणे बंद केले त्यामुळे पंचातील प्रमुख नागपूर येथील सुरेश वैराडकर, यवतमाळ येथील सुरेश गंगावणे, बिलासपूर, छत्तीसगड येथील अशोक गंगावणे, मोहन ओगले यवतमाळ, कैलास वैराडकर छत्तीसगड, प्रेम गंगावणे यवतमाळ, विनोद वैराडकर नागपूर यांनी अफवा पसरविली की प्रकाश ओगले यांनी दुसऱ्या जातीच्या मुलीसोबत विवाह केला.
या अफवेने जातपंचायतीच्या प्रमुखांनी प्रकाश ओगले व कुटुंबाला पूर्णपणे बहिष्कृत केले.
मात्र काही वर्षानंतर ओगले यांना जातीमध्ये समाविष्ट करणार असल्याचे सांगितले परंतु त्यासाठी त्यांना 5 हजारांचा दंड भरण्याची अट ठेवली.
आर्थिक परिस्थिती ठीक नसल्याने ओगले यांनी दंड भरण्यास नकार दिला.
प्रकाश ओगले यांना 7 मुली व 1 मुलगा असा मोठा परिवार होता.
समाजात मुलींना स्थळ शोधण्यासाठी त्यांना पंचायती मार्फत त्रास देण्यात आला.
6 जून 2021 ला प्रकाश ओगले यांच आजाराने निधन झाले, मात्र त्यांच्या पार्थिवाला समाजातील कुणी व्यक्तीने खांदा दिल्यास त्याला जातीबाहेर काढणार असल्याचं तुघलकी फर्मान काढल्याने कुणीही ओगले यांच्या पार्थिवाला हात लावण्यास तयार नव्हते.
म्हणून ओगले यांच्या मुलींनी वडिलांच्या पार्थिवाला खांदा दिला.
सदर जातपंचायतीच्या जाचाची बातमी माध्यमात झळकल्यावर जनप्रतिनिधी यांनी ओगले कुटुंबाची भेट घेत जातपंचायतीच्या तुघलकी निर्णयाचा विरोध करीत कायदेशीर कारवाई जातपंचायती विरोधात करण्याची मागणी केली.
ओगले कुटुंबातील गणेश ओगले यांनी पुरोगामी महाराष्ट्रातील जातपंचायती च्या प्रमुखांविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
चंद्रपूर शहर पोलिसांनी सामाजिक बहिष्कार कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला.
देशातील उपेक्षित समाजाला एकत्र आणण्याचे काम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले मात्र आजही जातीच्या नावाने कुटुंबांना समाजातून बहिष्कृत केल्या जाते, ही खरंच शोकांतिका म्हणावी लागेल.
