गडचांदूर/सै.मूम्ताज़ अली:-
चंद्रपूर जिल्ह्यात कोरपना तालुक्याच्या सिमेवर असलेल्या राजूरा तालुक्यातील शेवटचे गाव हरदोना(खुर्द)येथे कोरोनाने अक्षरशः थैमान घातल्याचे चित्र पहायला मिळत आहे. याच बरोबर गावात मोठ्याप्रमाणात तापाची साथ पसरली असून घरोघरी तापाचे रूग्ण असल्याचे चित्र आहे.येथील सरपंच,उपसरपंच कॉरंटाईन असून सेवानिवृत्त चपराश्याची प्रकृती सुद्धा चिंताजनक होती. मुख्य म्हणजे कोरोना महामारीत शासनप्रशासन ठिकठिकाणी सज्ज राहून परिस्थिती हाताळत आहे. मात्र येथील ग्रामसेवक याविषयी गंभीर दिसत नाही. शासकीय कर्मचारी म्हणून नियुक्त सदर ग्रामसेवक कोरोना महामारीत गेल्या कित्येक दिवसापासून गावाकडे फिरकलेच नसल्याचे कळते.यामुळे गावकरी सध्या वाऱ्यावर असल्याचे चित्र आहे.जिल्ह्यातील काही आजी-माजी आमदार या संकटात जीवाची पर्वा न करता दवाखाने,कॉरंटाईन सेंटर व गावोगावी भेटी देऊन लोकांच्या अडीअडचणी समजून घेत समाधानकारक उपाययोजना करण्यात मग्न आहे.मात्र राजूरा विधानसभेचे आजी-माजी आमदार याला अपवाद ठरत आहे. निवडणुकीच्या वेळी संपूर्ण विधानसभा क्षेत्र पिंजून काढणारी ही मंडळी आता या संकटसमयी स्वतःला घराच्या चार भिंतीत कोंडून घेतल्याची उपहासात्मक टीका नागरिकांकडून होताना दिसत आहे.
अंबुजा सिमेंट कंपनीमुळे हरदोना गावाला अधिक महत्व प्राप्त झाले. परिसरात उप्परवाही, कुकुडसाथ व परिसरात लहानमोठे गुडे असून कोरोना रूग्णात दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे.लोक मृत्युमुखी पडत असून सध्याच्या परिस्थितीत ५० पेक्षा जास्त पॉझिटिव्ह रुग्ण असल्याची माहिती आहे. यांना राजूरा येथे उपचारासाठी पाठविणत आले आहे.तर तापामुळे काही लोकांचा मृत्यु सुद्धा झाला आहे.गडचांदूरात आरटीपीसीआर केंद्र आहे मात्र त्याठिकाणी गर्दी असल्याने अनेक लोक तपासणीसाठी जात नाही.त्यामुळे संपुर्ण परिवारावर कोरोनाचे सावट आहे.असे चित्र असताना आजुबाजुची गावे धरून हरदोना खुर्द येथे "आरटीपीसीआर" केंद्र व कोविड लसीकरण केंद्र त्वरित सुरू करण्याची गरज निर्माण झाली आहे.
गडचांदूर येथील गर्दी लक्षात घेता अनेक जण पॉझिटिव्ह असताना देखील चाचणी करण्यास टाळाटाळ करीत आहे. त्याचा विपरीत परिणाम बाधीतांच्या परिवारावर होत असल्याची गंभीर बाब पुढे आली आहे.याकडे आरोग्य विभागाचे पाहिजे तसे लक्ष नसल्याने हरदोना व परिसरात मोठ्यासंख्येत रूग्ण वाढ होताना दिसत आहे.अनेक गावात तापाची साथ पसरली आहे.
हरदोना गावाचे सरपंच,उपसरपंच कॉरंटाईन आणि ग्रामसेवक बेपत्ता असल्याने गावकरी सध्या वाऱ्यावर असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.आजी आमदार असो की माजी,कुणीतरी या संकटसमयी आमच्याकडे जातीने लक्ष देऊन याठिकाणी एक आरटीपीसीआर केंद्र व कोविड लसीकरण केंद्र सुरू करावे जेणेकरून चाचण्या वाढेल आणि संसर्ग सुद्धा कमी होण्यास मदत होईल अशी मागणी हरदोना येथील काही सुज्ञ नागरिकांनी "News34" च्या माध्यमातून क्षेत्राचे आजी-माजी आमदाराकडे केली आहे.आता यापैकी कोण कामी येणार हे पाहणे औचित्याचे ठरणार आहे.