वरोरा - उधारीची रक्कम देण्यावरुन झालेल्या वादावादीनंतर मित्रानेच तरुणाचा जीव घेतला. भाजी कापण्याच्या तीक्ष्ण सुरीने भोसकून 26 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा शहरात भर दुपारी भर चौकात झालेल्या या हत्याकांडामुळे एकच खळबळ उडाली आहे.
उधारीवर घेतलेल्या एक हजार रुपयांच्या कारणावरुन मित्रानेच भाजी कापण्याच्या सुरीने 26 वर्षीय सुकराम अलाम याच्यावर भर गर्दीत वार केले. त्यानंतर 21 वर्षीय आरोपी निलेश ढोक याने स्वतः जखमी मित्राला रुग्णालयात दाखल केले, मात्र त्याचा मृत्यू झाला.
चंद्रपूर जिल्ह्यात अवैध धंद्यांना उत आले असून रोज नवीन शिलेदार या धंद्यात उतरत आहे, सदर प्रकरणातील आरोपी व मृतक हे दोघे जिवलग मित्र मात्र अवैध धंद्यात दोघांचे वर्चस्व होते, यात सुखराम ने काही कामासाठी निलेश कडून हजार रुपये उधार घेतले, पैसे देण्यात तो असमर्थ ठरल्याने सदर हत्याकांड घडले.
पोलिसांना घटनेची माहिती मिळताच आरोपीला रुग्णालयातच अटक करण्यात आली.
