अमरावती - कोरोनाची तिसरी लाट आलेल्या अमरावतीत म्युकरमायकोसिसचा पहिला बळी गेला आहे. 63 वर्षीय महिलेचा ब्लॅक फंगसने बळी घेतला. कोरोना बरा झाल्यानंतर घरी परतल्यावर तिला म्युकरमायकोसिसची लागण झाली होती.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने महाराष्ट्रासह देशभरात खळबळ उडवली आहे. कोरोनाग्रस्त मृतांची संख्याही दिवसेंदिवस वाढत चालली आहे. विशेष म्हणजे दुसऱ्या लाटेचा कहर थांबत नाही, तोच तिसऱ्या लाटेचे संकेत मिळत आहेत. अमरावती जिल्ह्यात तर कोरोनाची तिसरी लाट आल्याचंही बोललं जात आहे.
63 वर्षीय महिलेचा अमरावती येथील खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. कोरोनावर मात करुन घरी परतल्यानंतर महिलेला म्युकरमायकोसिस या आजाराची लागण झाली होती. संबंधित महिला अमरावती शहरातील साईनगर येथील रहिवासी होती. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या शक्यतेमुळे चिंता वाढली असतानाच म्युकरमायकोसिसचा पहिला बळी गेल्यामुळे अमरावती जिल्हात प्रचंड खळबळ माजली आहे.
