चंद्रपूर - कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने प्रशासन व राज्य सरकारने संचारबंदी लागू केली असली तरी अवैध धंदे करणारे मात्र छुप्या मार्गाने अवैध व्यवसाय करीत आहे.
शहर पोलीस स्टेशनच्या डीबी पथकाने 3 मे ला महाकाली कॉलरी परिसरात अवैध देशी दारूचा साठा पकडला, मात्र आरोपी फरार झाल्याने पोलिसांनी त्यांचा शोध घेणे सुरू केले आहे.
गुप्त माहितीच्या आधारे शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक वाघमारे यांना महाकाली कॉलरी परिसरात अवैध दारू साठा लपवून ठेवल्याची गुप्त माहिती मिळाली.
माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक वाघमारे सह डीबी पथकाने रेती बंकर जवळील झुडपात शोध घेतला असता त्यांना देशी दारूचे 30 खोके आढळून आले.
जप्त करण्यात आलेल्या देशी दारू साठ्याची एकूण किंमत 3 लाख रुपये असून हा अवैध दारू साठा अक्षय बुरडकर, संदीप येलपुलवार रा. आनंद नगर, महाकाली कॉलरी यांचा असल्याची खात्री पटली मात्र दोन्ही आरोपी फरार झाले, दोन्ही आरोपीचा शोध शहर पोलीस करीत आहे.
सदरची कारवाई चंद्रपूर शहर पोलीस निरीक्षक सुधाकर आंभोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी महेंद्र बेसरकर, स्वामीदास, शरीफ शेख व डीबी पथकातील कर्मचाऱ्यांनी यशस्वी केली.
