चंद्रपूर - नव्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परिसरातील नरेंद्रनगर, पागलबाबा नगरातील शिवानंद यादव यांचेघरी 18 मे ला घरफोडीची घटना घडली, या घटनेत अल्पवयीन मुलाला रामनगर पोलिसांनी अटक केली आहे.
फिर्यादी शिवानंद यादव यांच्या मुलीचे लग्न असल्याने ते बाहेरगावी गेले होते, त्यांच्या अनुपस्थितीत यादव यांचे नातेवाईक घरी झोपायला येत होते, नेहमीप्रमाणे 18 मे ला सायंकाळी नातेवाईक घरी आल्याने त्यांना घरचे कुलूप तुटलेल्या अवस्थेत दिसले.
याबाबत नातेवाईकांनी शिवानंद यादव यांना घटनेची माहिती दिली, फिर्यादी यादव यांनी तात्काळ रामनगर पोलीस स्टेशन गाठून घरफोडीची तक्रार दाखल केली.
सदर घरफोडीच्या घटनेत यादव यांच्या घरून सोन्या-चांदीचे दागिने व मोबाईल ची चोरी करण्यात आली.
रामनगर पोलीस स्टेशनच्या स्थानिक गुन्हे शोध पथकाने या घटनेचा छडा घटनेच्याया दिवशी लावत इंदिरानगर येथे राहणाऱ्या अल्पवयीन बालकाला अटक केली.
सदर अल्पवयीन बालक हा घरफोडीच्या गुन्ह्यात आरोपी म्हणून रेकॉर्ड वर होता त्यामुळे त्या आरोपीचा पोलिसांना सुगावा लागला. घरफोडीमधील सोन्या-चांदीचे दागिने, मोबाईल असा एकूण 1 लाख 10 हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
सदरची कारवाई जिल्हा पोलिस अधिक्षक अरविंद साळवे, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, पोलीस उपविभागीय अधिकारी शिलवंत नांदेडकर व रामनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रोशन यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि एकरे, मलिक, पोलीस कर्मचारी रजनीकांत पुठ्ठावार, प्रशांत शेंदरे, पुरुषोत्तम चिकाटे, संजय चौधरी, किशोर वैरागडे, पेतरस शिडाम, विकास जुमनाके, सतीश अवथरे, लालू यादव व भावना रामटेके यांनी यशस्वीपणे पार पाडली.
