गडचिरोली - गडचिरोलीत पुन्हा एकदा पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली आहे. महाराष्ट्र पोलिसांच्या सी-60 युनिट आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत 13 नक्षलवाद्यांना ठार करण्यात आल्याची माहिती आहे. त्यापैकी, 8 जणांचे मृतदेह जंगलातून ताब्यात घेण्यात आले आहेत.
एटापल्ली तालुक्यातील कोटमी पोलीस मदत केंद्राच्या हद्दीतील पैदी जंगल परिसरात ही चकमक उडाली. पोलिसांचे सी-60 पथक नक्षलविरोधी अभियान राबवत असताना ही चकमक उडाली. जंगल परिसरातून अद्याप 8 नक्षलवाद्यांचे मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत.
नक्षलवाद्यांनी काही दिवसांपूर्वीच गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील गट्टा पोलीस स्टेशनवर ग्रॅनाईट हल्ला केला होता. या ग्रॅनाईटचा स्फोट झाला नाही. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. परंतु, नक्षलवाद्यांनी पोलीस स्टेशन उडवण्याचा प्रयत्न करणं ही मोठी घटना मानली जात आहे. पोलीस स्टेशन पर्यंत नक्षलवादी पोहोचल्यानं पोलिसांना सतर्क व्हावं लागणार आहे. त्यात, पुन्हा एकदा पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली आहे.
