कोरपना ता.प्र.सै.मूम्ताज़ अली:-
कोरपना तालुक्यातील नावाजलेले शहर गडचांदूर येथील मुख्य मार्गावर मोकाट जनावरांचा हैदोस पहायला मिळत असून याच्यामुळे मोठ्याप्रमाणात वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. अपघाताची शक्यता बळावली असतानाच स्थानिक नगरपरिषदेच्या संबंधित विभागाने याकडे हेतुपुरस्सर डोळेझाक केल्याचे आरोप होत आहे.सदर समस्या त्वरीत मार्गी लावुन रस्ता मोकळा करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे. News34
शहरातील मोकाट जनावरांनी याठिकाणी अक्षरशः बस्तान मांडल्याचे चित्र पहायला मिळत असून वाटसरूंना तारेवरची कसरत करावी लागत आहे. अगोदरच शहरातील सैराट बाईक स्वारांमुळे लोकांना विशेषतः लहान मुलांना जीवमुठीत घेऊन रस्त्यावरून वाटचाल करावी लागत आहे.आशातच मोकाट जनावरांची समस्या ! डोकेदुखी बनली आहे.सदर रस्त्यावर सैरावैरा फिरत असलेले आणि काही ठिकाणी बस्तान मांडलेली ही मोकाट जनावरे वाहन जवळ आल्यावर सुद्धा जागेवरून हटत नाही. शेवटी नाईलाजाने चालकालाच काठीने बाजूला करावे लागत आहे.
याठिकाणी जनावरांचा कळप पाहुन हा "राष्ट्रीय महामार्ग आहे की,शहरातील एखादी संकुचित गल्ली" असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. अगोदरच या रस्त्याची रूंदी कमी,त्यावर दोन्हीबाजूला दिवसभर उभी असलेली लहान-मोठी वाहने तसेच बसस्थानक परिसरात खाजगी प्रवासी वाहनांची रेलचेल.यामुळे ये-जा करणाऱ्या वाहनांना मार्ग काढणे जिकरीचे ठरत आहे. याठिकाणी वाहतुक नियमांची पायमल्ली होताना दिसत असून वाहतुक पोलीसांनी याकडे लक्ष देऊन वाहतुकीसाठी अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनांवर कारवाई करावी तसेच नगरपरिषदेने मोकाट जनावरांचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी आहे.