कोरपना ता.प्र.सै.मूम्ताज़ अली:-
कोरपना तालुक्यातील नांदाफाटा या औद्योगिक परिसरात मागील अंदाजे तीन आठवड्यांपासून कोविड लस उपलब्ध नसल्याने येथील लसीकरण केंद्र ओसाड पडल्याचे चित्र पहायला मिळत आहे. लसीकरणासाठी येथील नागरिकांची वणवण भटकंती सुरू असून याला कोरपना तालुक्यातील आरोग्य विभागाचा अनागोंदी कारभार कारणीभूत असल्याचे आरोप नागरिकांकडून होत आहे.तालुक्यात ठिकठिकाणी नागरिक लसीकरणासाठी पुढाकार घेत असतानाच नांदाफाटा परिसरातील नागरिकांना मात्र लस उपलब्ध नाही. तातडीने येथील केंद्रावर लस उपलब्ध करून द्यावी अन्यथा आंदोलन उभारण्याचे संकेत नागरिकांनी दीले आहे.
नांदाफाटा औद्योगिक परिसर असून येथील लोकसंख्या १५ हजाराच्या जवळपास आहे. News34 आरोग्य विभागाकडून येथील लसीकरण केंद्राला आत्तापर्यंत १३५० लसीचे डोस पुरवण्यात आल्याची माहिती असून हे डोस येथील लोकसंख्येच्या १० टक्केही नाही.
येथील लसीकरण केंद्रावर लसच उपलब्ध नसल्याने ८४ दिवसांपेक्षा जास्त दिवस झालेल्या अनेक नागरिकांना दुसऱ्या डोससाठी इतर लसीकरण केंद्राचे उंबरठे झिजवावे लागत असल्याचे बोलले जात आहे. कित्येक नागरिकांनी पहिला डोस घेतल्याला १०० दिवस लोटूनही त्यांना अजूनही लसीचा दुसरा डोस मिळालेला नाही. यामुळे त्यांची चिंता वाढली आहे.असे असताना तिसर्या लाटेची भीती व्यक्त होत असून नागरिकांनी जास्तीत जास्त लसीकरण करावे असे आवाहन शासनप्रशासन वारंवार करीत आहे.मात्र येथे तीन आठवड्यापासुन लसीचा ठणठणाट आहे.लस टोचून घेण्यासाठी येथील नागरिकांची इतर ठिकाणी भटकंती सुरू असल्याने संताप व्यक्त होत असून तातडीने याठिकाणी लस उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे.
-------------//-------
नांदाफाटा येथील लोकसंख्येचा विचार करून नियमित लस उपलब्ध करून देण्याची विनंती वारंवार आरोग्य अधिकाऱ्यांकडे केली जात आहे.आम्ही शासनाच्या कार्यप्रणालीनुसार लसीकरण कार्यक्रमाचे नियोजन करतो असे अधिकारी सांगतात.मात्र पहिल्या डोसला १०० दिवसाचा कालावधी लोटत असताना अद्यापही अनेक नागरिकांना दुसरा डोस उपलब्ध झालेला नाही.याविषयी नागरिकांची चिंता वाढली असून औद्योगिक परिसर व लोकसंख्येचा विचार करून तातडीने नांदाफाटा येथील लसीकरण केंद्रावर लस उपलब्ध करून द्यावी अन्यथा नागरिकांना घेऊन आंदोलन उभारू.
शिवचंद काळे
सदस्य जिल्हा परिषद सदस्य
-----------//----------