मूल : एका महीला कर्मचाऱ्याशी कार्यालयातीलच एका ज्येष्ठ कर्मचाऱ्याने असभ्य वर्तन केल्याची घटना स्थानिक कृषी कार्यालयात घडली. दरम्यान सदर घटनेची तक्रार झाल्याने पोलीसांनी असभ्य वागणाऱ्या कर्मचाऱ्या विरूध्द गुन्हा दाखल केला आहे.
स्थानिक तालुका कृषी अधिकारी कार्यालयात सेवारत एका कृषी सेवक महीलेस तालुका कृषी अधिकारी यांनी कामानिमित्य बोलाविल्याने त्या कार्यालयात गेल्या. दरम्यान कृषी अधिकारी एका कामात व्यस्त असल्याने सदर महीला कर्मचारी साहेबांच्या बोलावण्याच्या प्रतिक्षेत कार्यालयात बसल्या होत्या. तेव्हा दुसऱ्या खोली मधुन बाहेर निघालेले त्याच कार्यालयातील कृषी सहाय्यक मानेराव यांनी सदर कृषी सेवक महीलेच्या कानाजवळ जाऊन काहीतरी बोलले. त्यानंतर त्याने सदर महीला कर्मचाऱ्याच्या डोक्यावरून दोन तीनदा हात फिरवत असभ्य व अशोभनिय वर्तन केले. यावेळी कार्यालयात अन्य कर्मचारी सुध्दा उपस्थीत होते. उपस्थित कर्मचाऱ्यांसमक्ष डोक्यावरून हात फिरवत असभ्य वर्तन केल्याने सदर महीला कर्मचाऱ्याला घडलेला प्रकार अपमानास्पद आणि गैर वाटल्याने सदर घटनेची त्या महीला कर्मचाऱ्याने पोलीसात तक्रार दाखल केली. दाखल तक्रारीवरून पोलीसांनी कृषी सहाय्यक मानेराव यांचे विरूध्द भादंवी ३५४ (ए) (i) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान कृषी सहाय्यक मानेराव फरार असुन पुढील तपास ठाणेदार सतिशसिंह राजपुत यांचे मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक राजश्री रामटेके करीत आहेत. सदर महीला कृषी सेवकास यापुर्वीही कार्यालयातील एका वरीष्ठ अधिकाऱ्याने या ना त्या कारणाने सदर महीला कर्मचाऱ्यास ञास देण्याचा प्रकार चालविल्याने त्याचा सदर महीलेच्या आरोग्यावर विपरीत परीणाम पडला होता. हे विशेष.
कार्यालयात घडलेला प्रकार अयोग्य आहे. महीला कर्मचाऱ्याच्या तक्रारीची दखल घेण्यात आली असुन त्यानुषंगाने वरीष्ठांना कळविण्यात आले आहे.
प्रशांत कासरडे
तालुका कृषी आधिकारी मूल